संशोधकांसाठी पर्वणी :
संशोधन मंडळासोबतच इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालय 1927 मध्ये सुरू केले. हे ग्रंथालय इतिहास व मराठीतील संशोधक आणि अभ्यासकांसाठी विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाले आहे. संशोधनाच्या निमित्ताने येणा-या देश-विदेशातील अभ्यासकांना या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचा अभ्यास करायला मिळतो.

*ग्रंथालयाची स्थापना, 25 हजारांवर ग्रंथसंपदा :
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या निधनानंतर संशोधन मंडळ आकाराला आले. अगदी त्याच कालखंडात म्हणजे 9 जानेवारी 1927 रोजी या ग्रंथालयाची स्थापना झाली. संशोधकांसोबत अभ्यासकांना या ग्रंथालयाचा उपयोग व्हावा हाच यामागे हेतू होता. सुरुवातीला अगदी दोन-अडीच हजार ग्रंथसंपदा असलेल्या या ग्रंथालयात आज 25 हजारांपेक्षा अधिक ग्रंथ असून, 750 पेक्षा अधिक सभासद नियमित त्याचा लाभ घेतात. शहरातील एकमेव मध्यवर्ती ठिकाणी हे ग्रंथालय असल्यामुळे येथे येणा-या वाचक, अभ्यासक आणि संशोधकांची नेहमीच वर्दळ असते.

*मराठीचा खजिना, मराठीसह भाषेचीही सेवा
ग्रंथालय पुरातन असल्याने त्यात दुर्मिळ अमूल्य असे ग्रंथ जतन करून ठेवले आहेत. त्यासोबत कथा, कादंब-या, ललित, चरित्र, धार्मिक,ज्योतिष, पर्यावरण, संदर्भ, शिक्षण अशा नानाविध ग्रंथांचे संग्रह केले आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेचेही ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाकडून प्राप्त ग्रंथांचाही समावेश आहे. दानशूर व्यक्तींच्या प्राप्त ग्रंथांमुळेही हे ग्रंथालय समृद्ध झाले आहे.