(१२ जुलै १८६४ – ३१ डिसेंबर १९२६). मराठीतून इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्‍चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान. इतिहाससंशोधक म्हणून विशेषेकरून ते मान्यता पावले. 
        
त्यांचा जन्म पुण्यास झाला. १८८२ मध्ये पुण्यातून ते मॅट्रिक झाले. मुंबईस एल्फिन्स्टन कॉलेज व पुण्यास डेक्कन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन १८९० मध्ये बी.ए.झाले. १८९१ मध्ये ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले, पण सु.अडीच वर्षांनी १८९३ मध्येच त्यांनी ती नोकरी सोडली. पुढे आयुष्यात त्यांनी कधीही, कसलीही नोकरी अशी केली नाही. विद्यार्थिदशेतच १८८९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता, पंरतु १८९२ मध्येच त्यांची पत्नी निवर्तली आणि त्याच वेळी त्यांनी दुस-या विवाहाचा विचारही  न करता स्वतःस प्रापंचिक पाशातून कायमचे सोडवून घेतले. पुढे ते पुणे, सातारा, वाई, धुळे, मिरज, तळेगाव-दाभाडे इ. ठिकाणी कमी-अधिक वर्षे वास्तव्य करून असले,

तरी बहुधा महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधात सतत हिंडत राहिलेले दिसतात.द-याखो-यातून प्राचीन अवशेष पहात व कोनाकोप-यांतून जुनी दप्तरे गोळा करीत असतानाच, त्यांचे लेखनकार्यही अव्याहतपणे सुरू होते. १८९४ पासून स्वतः सुरू केलेल्या भाषांतर तसेच कोल्हापूर येथील समर्थ, तसेच ग्रंथमाला, विश्ववृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इ. नियतकालिकांतून ते भरपूर लिहू लागले. मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या शीर्षकाचे अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड त्यांनी संपादून प्रसिद्ध केले(१८९८ – १९१७). ह्यापैंकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. राधामाधवविलासचंपू आणि महिकावतीची बखर हे दोन जुने ग्रंथ त्यांनी अनुक्रमे १९२२ व १९२४ मध्ये संपादून छापले व त्यांनाही मोठ्या विवेचक प्रस्तावना जोडल्या. ज्ञानेश्‍वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, निङ्त विचार, सुबंतविचार, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहतकाल असे काही त्यांनी संपादिलेले व लिहिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिद्ध झाले. मराठी धातुकोश, नामादिशब्दव्युत्पत्तिकोश इ. ग्रंथ त्यांच्या मृत्यूंनतर प्रसिद्ध होऊ शकले. राजवाड्यांच्या लेखांचे आणि प्रस्तावनांचे काही खंड शं. ना. जोशी आदींनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. धुळ्याच्या संशोधकच्या अंकांमधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रसिद्ध करू लागल्यामुळे राजवाड्यांचा बोलबाला होऊ लागला; तथापि ह्या स्वरूपाच्या कार्याचा प्रारंभ त्यांच्या आधीच का.ना. साने वगैरे संशोधकांनी केलेला होता. साधनांचा उपयोग करून मराठी सत्तेचा प्रत्यक्ष वृत्तांतात्मक इतिहास ग्रँट डफने इंग्रजीतून बराच सविस्तर असा सिद्ध केला होता.